हिंदू ऐक्य घोष हा निनादू द्या दिगंतरी
जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी ।।धृ०।।
दिव्य वारसा तुझा विश्वमान्य संस्कृती
वैभवात वाढल्या आपुल्या पिढ्या किती
हाय दुर्दशा तुझी वेदना उठे उरी ।।१।।
नांदले युगे युगे अंश ईश्वरी जिथे
भेदभाव मानिसी मानवांमधे तिथे
ऐक्यभाव जागृती कार्य हेच ईश्वरी ।।२।।
ऊठ मारुतीपरी सूर्यबिंब ग्रासण्या
संघटीत शक्ति हो रामराज्य साधण्या
कालकूट प्राशुनी ऊठ शंकरापरी ।।३।।
थोर शक्तिने तुझ्या क्रूर दैत्य मर्दिले
स्नेह भक्ति शक्तिने दैन्य दुःख वारिले
पाञ्चजन्य घोष हो जाग अर्जुनापरी ।।४।।
No comments:
Post a Comment