त्रिवार गर्जुनि सांगू आम्ही हिंदूंचा हा हिंदुस्थान
सांगू जगाला हिंदू आम्ही राष्ट्राचा आम्हां अभिमान
जय भारत जय हिंदुस्थान ।।धृ० ।।
देश धर्म इतिहास संस्कृती ध्वज भगवा डुलतो गगनी
हिंदुराष्ट्र बलवान करावे ज्वलंत उज्वल ध्येय मनी
संघटना हा मार्ग अमुचा विश्वकार्य हे असे महान ।।१।।
जातिपंथ जरी अनेक येथे धर्म अमुचा एक असे
कर्तृत्वाला समान संधी उच्चनीचता भेद नसे
सप्तसुरांच्या मैफिलीतुनी निनादते जणू एकच तान ।।२।।
नसानसांतुनी खेळे अमुच्या गंगायमुनेचे पाणी
कंठामधुनी सदैव स्फुरते अखंड संतांची वाणी
श्वासामधुनी अविरत चाले हिंदुत्वाचा मंत्र महान ।।३।।
सळसळणाऱ्या रक्तामधला कणकण या चैतन्याचा
ध्येयावरती अभंग निष्ठा अविचल भाव असे मनीचा
पोलादासम कणखर छाती बाहुदंड निर्भय बलवान ।।४।।
आत्मबलाच्या सामर्थ्यावर वैभवशाली राष्ट्र करू
हिंदुत्वाच्या जयघोषाने धरती नभ पाताळ भरू
मानवतेच्या कल्याणास्तव देऊ अमुचे पंचप्राण ।।५।।
No comments:
Post a Comment