ध्यास एक साधका अंतरांत ठेव तू
जाण यत्न देव तू जाण यत्न देव तू ।।धृ०।।
असो ध्रुवापरी तुझी अढळ ध्येयतारका
न थांबता पथावरी उचल पाय साधका
साधनेत आपुल्या मग्न हो सदैव तू ।।१।।
समोर आडवी तुला प्रलयलाट येऊ दे
पहाडही मधेच वा ध्येयवाट अडवू दे
वादळापुढे सदा घे सदैव धाव तू ।।२।।
नसेल सोबती कुणी संगती तुझ्या जरी
असेल रात काजळी भोवती तुझ्या जरी
संकटात अंतरी धैर्यदीप लाव तू ।।३।।
झुगार मोहपाश हे स्वार्थ सकल सोड तू
नकोस मागुती बघू बंध सकल तोड तू
ध्येयरूप हो स्वये विसर अन्य भाव तू ।।४।।
No comments:
Post a Comment