करा रे क्रांतीचा जयकार
नेतृत्वाने दिशा दिली मग कसला अन्य विचार ।।धृ०।।
निजरुधिराचे लावुनि कुंकुम वीरात्म्याचे ते हृदयंगम
भारतभूच्या विमोचनाचे स्वप्न करू साकार ।।१।।
नको आम्हाला ती यांत्रिकता व्यक्तिसुखाची साधनशुचिता
या देशाचा तुरुंग होणे आम्हां कसे रुचणार ।।२।।
शस्त्रक्रांतिचे जाळे पसरा संघटनेची फळी उभारा
गुप्त असू द्या क्रांतिवीर हे आश्रयास येणार ।।३।।
शस्त्रे अपुली सुसज्ज ठेवा डाव रिपुंचा उधळुनि लावा
या मार्गाने स्वातंत्र्याचा नवा मनु येणार ।।४।।
सिंहगर्जना करिती केशव देशाला नेतृत्व मिळे नव
कर्तृत्वाला काय असंभव अवनीवर असणार ।।५।।
No comments:
Post a Comment