ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृती
रोज अरुण चंद्र्मा आरतीस उगवती॥धृ०।।
धरुनि अभय सावली मायभूमिच्या शिरी
हा युगे युगे उभा अचलराज हिमगिरी
चरणि अर्घ्य द्यावया सिंधुलहरी उसळती॥१॥
शब्द स्वप्निही दिला तरिही तो ठरो खरा
म्हणुनि राव रंक हो ही इथे परंपरा
पितृवचन पाळण्या विजनवासि रघुपती॥२॥
धर्मराज तो तया भीम पार्थ वंदिती
देव सूत होऊनी कर्मयोग सांगती
ज्ञानियामुखे इथे बोलते सरस्वती॥३॥
याच भूवरी जिजा शिवनॄपास वाढवी
श्रीसमर्थवैखरि राष्ट्रधर्म जागवी
नीति नांदते इथे सिध्द शक्ति संगती॥४॥
ह्रदयी आमुच्या सदा मंत्र शांतिचा वसे
कधीही मानवासवे वैर आमुचे नसे
अंतरात अस्मिता परी सदैव जागती॥५॥
No comments:
Post a Comment