आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली ।।धृ०।।
पिवळ्या खलसर्पाने केला गोष्टींचा देखावा
गळ्यात घालुनि हात सांधिला क्रूर आपला कावा
या अधमाचा भ्याड धर्म का शब्दाला जागावा
आज उठे गरुडांची सेना सर्पांना निर्दाळी ।।१।।
विंध्य हिमाचल यमुना गंगा सर्व पेटली राने
गर्जत हरहर समुद्र उठले पेटुनिया त्वेषाने
रक्ताच्या अक्षरांनी लिहिली इतिहासाची पाने
मर्दांची मनगटे जाहली जळत्या वज्र मशाली ।।२।।
उठो उठो जगदंबे आता लाव तुझा अंगारा
वीर निघाले संसारावरी ठेऊनिया निखारा
प्राणांचा नैवेद्य तीर्थ तू हो रक्ताच्या धारा
उदो उदो जगदंबे आता गाढ शत्रु पाताळी ।।३।।
No comments:
Post a Comment