Sunday, July 12, 2020

१५२ . की दीपज्योतिने सूर्या ओवाळावे

१५२ .  की दीपज्योतिने  सूर्या ओवाळावे 

की दीपज्योतिने  सूर्या ओवाळावे 
तेजाचे दर्शन शब्दे केवि घडावे ।।धृ०।।

सुस्नात सुमंगल ऋषिसम पावन मूर्ती 
ती प्रसन्न मुद्रा सतेज निर्भय कांती 
त्या अमृतशब्दे कर्ण पुनीत करावे ।।१।।

ती स्नेहल दृष्टी वत्सल तो व्यवहार 
ती दैवी गुणसंपदा मानवाकार 
ते प्रेम निरागस पुन्हा पुन्हा लाभावे ।।२।।

साक्षात तपस्या त्यागाचा तो ठेवा 
तो दिव्य वारसा सतत पुढे चालावा 
त्या आदर्शाला जीवनभर गिरवावे ।।३।।

आसेतु हिमाचल तुमचा हो संचार 
संजीवन घेऊन उठतील पुत्र अपार 
त्या चरण द्वयाचे दर्शन पुनरपि व्हावे ।।४।।

तो संघटनेचा मंत्र सतत घुमवावा 
दृढ सामर्थ्याचा प्रत्यय जगता यावा 
हे यश मिळवाया आशिर्वादा द्यावे ।।५।।


No comments:

Post a Comment