हिंदुत्वाचे कोटी सूर्य कर एकवटोनी प्रखरावे
हिन्दुभूमिच्या सामर्थ्याचे विराट दर्शन घडवावे ।।धृ०।।
यत्नपाऊलें भगीरथाची ध्येयधुंदीतच चालावी
गंगेसमही स्वर्गवाहिनी जीवनधारा अखंड व्हावी
पूर्वपिढ्यांपरी कर्तृत्वाचे सदा हिमालय उंच उठावे ।।१।।
धवलचरित्रे मूकस्तंभसि किती जीवने गावोगावी
नरसिंहाची रूपे त्याची असुरपणावर चालून जावी
लाख संकटी प्रल्हादांनी भक्तिनिश्चये सहज तरावे ।।२।।
पार्थ वारसा अर्थ कळावा पार्थिवातल्या चैतन्याचा
स्वधर्मप्रेरित पुरुषार्थाचा समाजजीवन उभवायाचा
श्रीकृष्णाची गीता पिऊनी महाभारती प्राण फुलावे ।।३।।
विज्ञानाच्या नव आकाशी समानतेच्या पूर्ण प्रकाशी
शाश्वत मूल्ये घेऊ उराशी मानवजीवन करू अविनाशी
हिंदुत्वाच्या असीम कक्षा संघशक्तीने तेज उठावे ।।४।।
No comments:
Post a Comment