Tuesday, July 7, 2020

११६ . उसळत्या रक्तात माँ ज्वालामुखीचा दाह दे

११६ . उसळत्या रक्तात माँ  ज्वालामुखीचा दाह दे 

उसळत्या रक्तात माँ  ज्वालामुखीचा दाह दे 
वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असू दे ।।धृ०।।

कीर्तीचे आकाश जेव्हा चंद्रज्योतींनी झळाळे 
वा धनाची लाट ती पायावरी येऊन लोळे 
हात हा सोडू नको निर्मोहिता मज त्यात दे ।।१।।

विसरू दे माझ्यातला मी देशभक्ती उसळू दे 
रंग तू मी रंगणारा दंग त्यातच होऊ दे 
कापराचे भाग्य मजसी अनुभवा आणून दे ।।२।।

क्षण कधी तुज विसरलो वा लागली निद्रा कधी 
जागवी मज हलवुनी वा ताडुनीही तू कधी 
चंदनाची खूण माझ्या मस्तकी उठवून दे ।।३।।

ध्येयपथ जो चाललो मी विसर त्याचा मज नसावा 
गीत आणि स्वर तुझा माझिया कंठात द्यावा 
तव पदी हो सांगता हि जीवनाची आस दे ।।४।।

चेतलेला पोत आता विझुनि जावा ना कधी 
निर्झराला सागराचा विसर व्हावा ना कधी 
वैभवाचे ज्ञान देता वैष्णवाचे वाण दे ।।५।।



No comments:

Post a Comment