दाहि दिशांना जाऊ फिरू मेघासम आकाश भरू
अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू ।।धृ०।।
क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही
दानवतेच्या विषवल्लीचे कोठेही बेणे नाही
देवत्वाचे भरुनी अमृत जगताचे आधार ठरू ।।१।।
बहरून आल्या शेतावरती वीज पडू न करू ऐसे
वाटेवरचे दगड परंतु दूर करू लाटेसरसे
विनाश नाही कार्य आपुले जीवन अवघे नित बहरू ।।२।।
मानवमात्राची स्वतंत्रता कधी नाहीशी होऊ नये
हृदयशून्य यांत्रिकी युगाने स्वत्व कधी हरवूच नये
जीवनमूल्या भोग सागरी बुडवुनि ना कधीही विसरू ।।३।।
जीवनदर्शन देशांतरीचे अनुभव घेता पूर्ण नसे
जगताच्या प्रारंभापासून शाश्वत धर्म इथे विलसे
फिरुनी एकदा ज्ञान प्रकाशे विश्वशांती साकार करू ।।४।।
वा सुंदर. अप्रतिम
ReplyDelete