१७६. हिंदूभूमिच्या परमवैभवा प्रगटविण्या साकार
हिंदूभूमिच्या परमवैभवा प्रगटविण्या साकार
समर्थ होऊन राष्ट्र भरू दे स्वत्वाची हुंकार ||धृ०||
पोषण होवो तनामनांचे अशी हवी समृद्धी
अन लाभो सकलास त्यासवे निरामयाची सिद्धी
संस्कारातून राष्ट्र भावना उपजावी अनिवार ||१||
स्वयंपूर्ण हो समाज हा अन स्वावलंबि हो व्यक्ती
समाजभक्ती रुजो मनांतुन अशी घडो अभिव्यक्ती
व्यष्टी समष्टी एकत्वाचा घडो नित्य संस्कार ||२||
जोडुन ठेवी चराचरा जो धर्म सनातन इथला
आज आपुल्या आचारातुन जगता दाउ चला
दिव्य अशा युगधर्माचा हो पुनश्च साक्षात्कार ||३||
हिंदू हिंदू एकात्म करावा स्नेह अर्पुनी शुद्ध
समर्थ भारत आज घडविण्या संघ शक्ती हि सिद्ध
सामर्थ्यास्तव संघटनेचा घडु दे अविष्कार ||४||